पैठणमध्ये डीजेच्या तालावर रंगला रास दांडिया; महिलांची प्रचंड गर्दी

Foto
पैठण, (प्रतिनिधी) : नवीन कावसान येथील जय वैष्णवी देवी नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने आयोजित रास दांडिया कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे डीजेच्या तालावर महिला व तरुणींनी दांडियाचा आनंद लुटत आहेत. रंगीबेरंगी पारंपरिक वेशभूषा आणि उत्साहपूर्ण वातावरणामुळे कार्यक्रमस्थळी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.\

राजे संभाजी क्रीडा मंडळ, नवीन कावसान यांच्या संचलनाखाली जगद्गुरू संत तुकाराम महाराज मंदिर परिसर, साई कॉलनी, नवीन कावसान, पैठण येथे नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवातील रास दांडिया कार्यक्रम महिलांसाठी विशेष आकर्षण ठरत आहे. या कार्यक्रमात उत्कृष्ट रास दांडिया, उत्कृष्ट महिला, उत्कृष्ट
पुरुष आणि उत्कृष्ट वेशभूषा अशा विविध विभागांत आकर्षक पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत. रास दांडिया स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी ११, १११ रुपये, तर महिला व पुरुष गटात प्रथम क्रमांकासाठी प्रत्येकी ५,५५५ रुपयांचे पारितोषिक विजेत्या स्पर्धकांना देण्यात येणार आहे.

अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष संतोष पा. जाधव, उपाध्यक्ष भैरव हुरुफळे, कार्याध्यक्ष गणेश पा. पवार व स्वागताध्यक्ष म्हणून कृष्णा पा. मापारी यांनी दिली आहे. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने आयोजित या सांस्कृतिक कार्यक्रमामुळे परिसरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. महिलांच्या मोठ्या सहभागामुळे रास दांडिया कार्यक्रमाला विशेष रंगत आली आहे.